आंतराष्ट्रीयतंत्रज्ञान

ज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन

केंब्रिज: ज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे बुधवारी सकाळी निधन झाले. ते 76 वर्षांचे होते. केंब्रिज येथील राहत्या घरी हॉकिंग यांनी अखेरचा श्वास घेतला. हॉकिंग यांच्या कुटुंबीयांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर हाकिंग यांनी आपल्या दुर्धर अशा आजारपणावर मात करत विज्ञान विषयात महत्त्वपूर्णय योगदान दिले. त्यामुळे अनेकांसाठी ते एक आदर्श होते. विश्वाची उत्पत्ती आणि कृष्णविवरांसंदर्भात त्यांनी मांडलेल्या सिद्धांतांना वैज्ञानिक जगतात अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जातात. याशिवाय, त्यांनी भौतिकशास्त्र, खगोलशास्त्र हे क्लिष्ट विषय सामान्यांनाही समाजावेत, यादृष्टीने लिखाण केले. त्यांचे ‘ब्रिफ हिस्टरी ऑफ टाईम’ हे पुस्तक विशेष गाजले. या पुस्तकात त्यांनी बिग बँग आणि कृष्णविवरासंदर्भात सविस्तर विवेचन केले होते.

हॉकिंग यांचा जन्म ८ जानेवारी १९४२ साली इंग्लंडमध्ये ऑक्सफर्ड येथे झाला. हॉकिंग एनर्जी, हॉकिंग्ज रेडिएशन यांसह अनेक शोधांसाठी ते प्रसिद्ध आहेत. हॉकिंग यांची ब्रिफ हिस्टरी ऑफ टाइम, ब्लॅक होल अॅन्ड बेबी युनिवर्सेस अन्ड इदर एसेज, द युनिवर्स इन नटशेल, ऑन द शोल्डर्स ऑफ जायंटस यासारखी अनेक पुस्तकं प्रसिद्ध आहेत. भौतिकशास्त्रातले जगातील अत्यंत मानाचे व मोठे पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. २००१ साली टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च या मुंबईतील विज्ञानक्षेत्रातील संशोधन संस्थेने आयोजीत केलेल्या ‘स्ट्रींग’ या परिषदेसाठी त्यांना आमंत्रित केलं होतं. त्या परिषदेत हॉकिंग्ज यांनी दिलेलं व्याख्यान प्रसिद्ध आहे. टीआयएफआरने त्यांना सरोजिनी दामोदरन फेलोशिपही दिली आहे.

तुमची प्रतिक्रिया नोंदवा
टॅग्ज
अजून दाखवा

संबंधित लेख

Close
%d bloggers like this: