आंतराष्ट्रीय

सोमालिया बॉम्बस्फोटानं हादरलं, 18 जणांचा मृत्यू, 20 जण जखमी

दोन कारमधील बॉम्बस्फोटांमुळे सोमालियातील मोगादिशू हे राजधानीचे शहर हादरले असून या स्फोटात १८ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर २० जण या स्फोटात जखमी झाले आहेत. जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याचीही शक्यता आहे. मोगादिशू येथे असलेल्या राष्ट्रपती भवनाजवळ आणि एका हॉटेलसमोर दोन कारमध्ये बॉम्बस्फोट झाले अशी माहिती पोलीस कॅप्टन मोहम्मद हुसैन यांनी प्रसारमाध्यमांना दिली. एएनआयने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

आमिन अॅम्ब्युलन्स या रुग्णवाहिकेने स्फोटातील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. सरकारने एक दिवस आधीच दहशतवादी हल्ल्याचा इशारा दिला होता आणि त्यानंतर दुसऱ्याच दिवशी हे दोन स्फोट झाले. अल-शबाब या दहशतवादी संघटनेने या स्फोटाची जबाबदारी स्वीकारली आहे. अल-शबाब ही दहशतवादी संघटना अल कायदा या संघटनेशी संबंधित आहे. याआधी डिसेंबर महिन्यात १८ पोलिसांचा मृत्यू याच दहशतवादी संघटनेने केलेल्या हल्ल्यात झाला होता.

मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात मोगादिशूमध्ये ट्रकमध्ये बॉम्ब लावून त्याचा स्फोट घडवण्यात आला. ज्या स्फोटात ५१२ लोकांचा मृत्यू झाला होता. सोमालियाच्या इतिहासातील हा सर्वात मोठा हल्ला होता. या हल्ल्यामागेही अल-शबाब ही दहशतवादी संघटना होती असे सोमाली सरकारने स्पष्ट केले होते. आता पुन्हा एकदा याच दहशतवादी संघटनेने सोमालियाच्या राजधानीत स्फोट घडवून आणला आहे. या स्फोटात १८ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर २० जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर उपचार सुरु करण्यात आले आहेत.

तुमची प्रतिक्रिया नोंदवा
टॅग्ज
अजून दाखवा

संबंधित लेख

Close
%d bloggers like this: