राष्ट्रीय

जिजाऊ जयंतीला सिंदखेड राजाला येणार, केजरीवालांचे मराठीत ट्विट

सुरूवातीला पोलिसांनी केजरीवाल यांच्या सभेला परवानगी नाकारली होती.

arvind-kejriwal-2

दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल हे दि. १२ जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ जयंती दिनी सिंदखेड राजा येथे येत आहेत. यावेळी ते सभा घेणार असल्याचेही समजते. या निमित्त त्यांनी आज (मंगळवार) मराठीतून ट्विट केले आहे. नमस्कार, राजमाता जिजाऊ जयंती दिनी १२ जानेवारीला महाराष्ट्रातील तमाम जनतेशी संवाद साधायला सिंदखेड राजा येथे येत आहे, असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

केजरीवाल हे येथे सभा घेणार आहेत. सुरूवातीला पोलिसांनी केजरीवाल यांच्या सभेला परवानगी नाकारली होती. नंतर पोलिसांनी या सभेला परवानगी दिल्याचे समजते. त्यामुळेच केजरीवाल यांनी मराठीतून ट्विट करत महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधणार असल्याचे म्हटले आहे.केजरीवाल यांच्या उपस्थितीत राज्यातील पर्यायी राजकारणाची घोषणा होणार आहे. भाजपा व काँग्रेस यांचे जागतिकीकरण, खासगीकरण व उदारीकरणाच्या राजकारणाच्या धोरणामुळे देशात अराजकता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर दिल्ली मॉडेल राजकारणाचा पर्याय निर्माण करण्यात येत आहे, असे शिवराज्य पक्षाचे अध्यक्ष माजी खासदार ब्रिगेडिअर सुधीर सावंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते. या पर्यायी राजकारणाच्या मुद्दय़ावर सिंधुदुर्गात स्वतंत्र पॅटर्न राबवून दहशतवाद, गुंडगिरी मोडीत काढण्यासाठी समविचारी पक्षांशी समझोता करू असे त्यांनी सांगितले होते.

छत्रपती शिवाजी महाराज हे अवघ्या महाराष्ट्राचे दैवत आहे. त्यांचे दैवत असलेल्या राजमाता जिजाऊंवरही संपूर्ण महाराष्ट्राची निष्ठा आहे. त्यांच्या जयंतीच्या दिवशी जिजाऊंचे जन्मस्थळ असलेल्या सिंदखेड राजा येथे मोठ्या संख्येने राज्यातील बांधव जमत असतात. याठिकाणी होणारी गर्दी पाहता आपने या ठिकाणाहूनच 2019 च्या निवडणुकांचे रणशिंग फुंकण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी 12 जानेवारीला केजरीवाल याठिकाणी येतील असे जाहीर करण्यात आले. पण भीमा कोरेगाव येथील हिंसाचारानंतर निर्माण झालेली तणावाची परिस्थिती लक्षात घेता, पोलिसांनी या कार्यक्रमाला परवानगी नाकारली होती.

तुमची प्रतिक्रिया नोंदवा
टॅग्ज
अजून दाखवा

संबंधित लेख

Close
%d bloggers like this: