चित्रपट पुनरावलोकनमनोरंजनसिनेमा

Firangi Movie Review : ​बोअर करतो ‘फिरंगी’,कपिल शर्माचा ‘अ‍ॅव्हरेज ड्रामा’

प्रेक्षकांना हसून हसून लोटपोट करणारा कॉमेडियन कपिल शर्मा याचा दुसरा बॉलिवूड सिनेमा आज शुक्रवारी रिलीज झाला.  ‘फिरंगी’ हे या चित्रपटाचे नाव. कपिलचा हा चित्रपट पाहण्यास आपण सगळे उत्सूक आहात. तेव्हा जाणून घेऊ या, हा चित्रपट कसा आहे ते…

कपिल शर्माचे देश-विदेशात कोट्यवधी चाहते आहे. निश्चितपणे कपिलचे चाहते ‘फिरंगी’ पाहण्यास उत्सूक होते, आहेत. कपिल शर्माच्या या चित्रपटात कपिल ऐवजी एक  उत्साही दादी आणि अनेक प्रतिभावान कलाकारांची भरमार आहे, हे आधीच सांगितले पाहिजे. पण कपिलचा चित्रपट आहे म्हणून हसून हसून लोटपोट होण्याचा तुमचा इरादा असेल तर ‘फिरंगी’ तुम्हाला मोठा धक्का देऊ शकतो.
कपिल शर्मा या चित्रपटाची सर्वांत मोठी जमेची बाजू आहे. अगदी तसाच कपिल हाच या चित्रपटाचा सर्वांत मोठा कमकुवत दुवा आहे.
‘फिरंगी’ हा  बेहरामपुरिया गावात राहणाºया एका साध्याभोळ्या मंग्याची (मंगत्रम या नावाचे लघू रूप मंग्या, कपिलने ही भूमिका साकारली आहे.) कथा. स्वातंत्र्यापूर्वीची म्हणजे १९२० सालची कथा यात दाखवली आहे. महात्मा गांधी ब्रिटीशांविरूद्ध आंदोलन छेडत विदेशी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करतात. या आंदोलनाचा जोर वाढत असताच मंग्या नोकरीसाठी धडपडत असतो. अनेक प्रयत्न करूनही मंग्याला पोलिस दलात वा अन्य कुठेही नोकरी मिळत नाही. म्हणायला मंग्या बेरोजगार असतो. पण मंग्याच्या पायात मात्र चांगलाच दम असतो. पाठीदुखी असलेल्या कुणालाही बरे होण्यासाठी मंग्याची एक लाथ पुरेशी असते. पायाळू असल्याने  परमेश्वरी कृपेने त्याला हे वरदान मिळाले असते. यामुळे मंग्या अख्ख्या गावात सर्वांचा लाडका असतो. पुढे  हेच वरदान मंग्याच्या कामी येते. ब्रिटीश अधिकारी डेनिअलला (एडवर्ड सोनेनब्लिक) पाठदुखीचा त्रास असतो. मंग्या त्याची मदत करतो आणि या मोबदल्यात डेनिअल त्याला नोकरी देऊ करतो. मंग्या अतिशय आनंदाने ही नोकरी स्वीकारतो आणि काहीच दिवसांत  डेनिअलचा विश्वासू सहकारी बनतो. याचदरम्यान शेजारच्या गावात एका मित्राच्या लग्नात मंग्या व सरगीची(ईशिता दत्ता) नजरानजर होते.  मंग्या पहिल्याच नजरेत सरगीच्या प्रेमात पडतो. सरगीही मंग्यावर भाळते. एकदिवस मंग्या सरगीचा हात मागायला तिच्या घरी पोहोचतो. पण सरगीचे आजोबा लालाजी (अंजन श्रीवास्तव) या लग्नाला नकार देतात. ब्रिटीशांच्या दरबारी नोकर असलेल्या माणसाला मी माझी नात देणार नाही, असे सांगून सरगीचे आजोबा मंग्याला हाकलून लावतात. ब्रिटीश वाईट नाहीत, हे लालाजींना पटवून देण्यासाठी मंग्या जीवाचे रान करतो, पण लालाजी बधत नाहीत. इकडे मंग्या लालाजींचे मन वळवण्यासाठी प्रयत्न करत असतो तर तिकडे ब्रिटीश अधिकारी डॅनिअल दृष्ट राजासोबत मिळून दारूच्या कारखान्यासाठी सरगीच्या गावाची निवड करतो. यानंतर सगळ्यांना गाव खाली करण्याचे आदेश मिळतात. लालाजी व गावकरी याचा विरोध करतात. मंग्या हीच संधी साधतो आणि लालाजींचे मन जिंकण्याच्या नादात या प्रकरणात मध्यस्थी करण्याची जबाबदारी स्वीकारतो. पण होते उलटेच. मंग्यालाच हाताशी धरून डेनिअल व राजा उलटी अशी काही उलटी चाल खेळतात की मंग्या लालाजींच्याच नाही तर सरगीच्याही मनातून उतरतो.  सरगी व लालाजींचा गैरसमज दूर करण्यासाठी मंग्या नाही नाही ते करतो.   लालाजी व सरगीचा गैरसमज दूर करण्यात मंग्याला यशस्वी ठरतो वा नाही, हे पाहण्यासाठी  तुम्हाला चित्रपट पाहायला चित्रपटगृहात जावे लागेल.

कपिल शर्माचा चित्रपट म्हणून यात एकापेक्षा एक विनोद पाहायला मिळतील, अशी अपेक्षा करणाºयांसाठी सांगायचे झाल्यास हा चित्रपट एक साधा चित्रपट आहे. ना चित्रपटात कपिलची कॉमेडी आहे ना, या कॉमेडीची उणीव भरून काढणारी पटकथा आहे. खरे तर मंग्याच्या भूमिकेत कपिल कुठेही फिट बसत नाही, हे चित्रपट पाहताना वारंवार जाणवते. या भूमिकेसाठी तो बराच वयस्क वाटतो. देशी गर्लच्या भूमिकेत ईशिता दत्ता जमून आलीयं. राजेश शर्मा, जमिल खान या सगळ्यांनीही उत्तम काम केले आहे. अभिनेता कुमुद मिश्रा याने साकारलेली राजाची भूमिकाही प्रभावी आहे. बनावटी ब्रिटीश उच्चार माफ केलेत  तर मोनिका गिल हिचे कामही चांगले आहे. चित्रपटाचे संगीतही मधूर आहे. पण ढिसाळ पटकथा आणि मध्यवर्ती भूमिकेत कुठेही फिट बसत नसलेला कपिल यामुळे या चित्रपटाला केवळ ‘अ‍ॅव्हरेज’ असेच म्हणता येईल. त्यामुळेच कपिलला पाहायला अति आतूर असाल तरच हा चित्रपट पाहिलेला बरा. अन्यथा ‘फिरंगी’ टीव्हीवर येईपर्यंत प्रतीक्षा केलेलीच बरी.

तुमची प्रतिक्रिया नोंदवा
टॅग्ज
अजून दाखवा

संबंधित लेख

Close
%d bloggers like this: