International

विजय माल्याचं प्रत्यार्पण लांबणीवर २ एप्रिलपर्यंत जामीनात वाढ

भारतीय बँकांचे कोट्यवधी रुपयांचे कर्ज बुडवून फरार झालेल्या विजय माल्याचे प्रत्यार्पण आणखी लांबणीवर पडले आहे.

vijay-mallya

लंडन : भारतील बँकांना सुमारे ९ हजार कोटी रुपयांचा चुना लावून फरार झालेला मद्यसम्राट विजय मल्ल्या याचे प्रत्यार्पण आणखी लांबणीवर पडले आहे. गुरुवारी याप्रकरणी लंडनमधील वेस्टमिनस्टर मॅजिस्ट्रेट कोर्टासमोर झालेली सुनावणी पूर्ण होऊ शकली नाही. त्यामुळे याप्रकरणी कोणताही निर्णय झाला नाही. दरम्यान, कोर्टाने मल्ल्याला दिलासा दिला असून त्याच्या जामीनात २ एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

भारत सरकारने मल्ल्याविरोधात सादर केलेल्या पुराव्यांवर आक्षेप घेत युक्तीवाद करण्याची मागणी त्याच्या वकीलांनी वेस्टमिनस्टर मॅजिस्ट्रेट कोर्टात केली होती. त्यासाठी प्रत्यक्ष मल्ल्यादेखील कोर्टात हजर होता. मात्र, यावेळी बचाव पक्षाचा युक्तीवाद पूर्ण होऊ शकला नाही. दरम्यान, त्यांनी भारत सरकारची याचिका रद्द करण्याची मागणी कोर्टात केली. ही सुनावणी या प्रकरणातील अंतिम सुनावणींपैकी एक ठरण्याची शक्यता होती. मात्र, ती पूर्ण होऊ न शकल्याने आता आणखी वाट पहावी लागणार आहे.

कोर्टात भारताचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या ब्रिटनची क्राऊन प्रॉसिक्यूशन सर्विस (सीपीएस) ने मल्याविरोधात पुरावे सादर करीत आपला युक्तीवाद सुरु केला. भारत सरकारकडे मल्याविरोधात खटला उभा करण्यासाठीच्या प्राथमिक पुराव्यांची कमतरता असल्याचा दावा बचाव पक्षाने केला होता. हा दावा खोडून काढण्याचा प्रयत्न कोर्टात सीपीएसने भारताच्यावतीने केला. दरम्यान, कोर्टात इतरही खटले सुरु असल्याने तसेच मल्ल्याच्या प्रत्यार्पण प्रकरणात पुढील सुनावणीची तारीख निश्चित होऊ शकली नाही. त्यामुळे कोर्टाने मल्ल्याला २ एप्रिलपर्यंत जामीनात वाढ केली.

त्यामुळे आता या प्रकरणात बाचाव आणि याचिकाकर्ते मिळून पुढील तीन महिन्यांत पुन्हा सुनावणीसाठी एक तारीख निश्चित करतील. सीपीएसने सादर केलेले पुरावे हे भारत-ब्रिटन यांच्यातील गुन्हेगार प्रत्यार्पण करारानुसार अनुकूल नसल्याचा दावा मल्ल्याच्या वकिलांनी केला. त्याचबरोबर मल्ल्याच्या प्रत्यार्पणानंतर त्याची रवानगी होण्याची शक्यता असलेल्या मुंबईतील ऑर्थर रोड येथिल मुंबई मध्यवर्ती कारागृहाच्या बॅरॅक क्रमांक १२ मधील नैसर्गिक प्रकाश आणि आरोग्यासंबंधी सुविधांच्या उपलब्धतेबाबात यावेळी बचाव पक्षाने भारताच्या बाजूने स्पष्टीकरण मागितले.

लंडनमध्ये आश्रयाला आलेल्या विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पण प्रकरणाच्या सुनावणीला ४ डिसेंबर २०१७पासून सुरुवात झाली. मल्या मार्च २०१६पासून भारतातून फरार झाला आहे. त्याला एप्रिल २०१७ मध्ये एका प्रत्यार्पण वॉरंटवर स्कॉटलंड यार्ड पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर ६,५०,००० पाऊंड बॉण्ड जमा केल्यानंतर त्याला जामीन मिळाला होता.

 

तुमची प्रतिक्रिया नोंदवा
टॅग्ज
अजून दाखवा

संबंधित लेख

Close
%d bloggers like this: