CricketSports

भारताचीही निराशाजनक सुरुवात

भुवनेश्वर कुमारच्या नियंत्रित मा-याच्या जोरावर भारताने पहिल्या कसोटी सामन्यात यजमान दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव ७३.१ षटकात २८६ धावांमध्ये संपुष्टात आणला. भुवनेश्वरने ८७ धावांत ४ खंदे फलंदाज बाद करत यजमानांच्या फलंदाजीला खिंडार पाडले.

 

केपटाऊनः गोलंदाजांच्या कामगिरीमुळे भारतीय संघाला झालेला आनंद फारकाळ टिकू शकला नाही. यजमान दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी भेदक मारा करत पहिल्या केपटाऊन कसोटीच्या पहिल्या दिवशी भारताची ३ बाद २८ अशी अवस्था केली. विजय (१), धवन (१६), विराट कोहली (५) असे स्टार फलंदाज फिलँडर, स्टेन, मॉर्कल आणि रबाडापुढे निष्प्रभ ठरले.

फिलँडरने पाचव्या षटकात मुरली विजयला बाद करून भारताला पहिला धक्का दिला. त्याच्याच पुढच्या षटकात डेल स्टेनने आपल्याच गोलंदाजीवर झेल घेऊन धवनला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. भारताचा कर्णधार विराट कोहलीही अवघ्या ५ धावा करून परतला. खेळ थांबला, तेव्हा पुजारा ५ धावांवर खेळत होता, तर रोहित शर्माने अद्याप खाते उघडले नव्हते.

त्याआधी भुवनेश्वरकुमारच्या प्रभावी गोलंदाजीमुळे भारताने दक्षिण आफ्रिकेला पहिल्या डावामध्ये २८६ डावांत रोखण्यात यश मिळवले. सामन्याच्या तिसऱ्याच चेंडूवर भुवनेश्वरने दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर एल्गरला बाद करून भारताला पहिले यश मिळवून दिले. खेळपट्टीकडून मिळणारी साथ आणि वाऱ्यामुळे चेंडू स्विंग होत असल्याचा पुरेपूर फायदा भुवनेश्वरने घेतला. त्याने मार्क्रम आणि हशिम अमला यांनाही झटपट माघारी पाठवले. पाचव्या षटकात दक्षिण आफ्रिकेची अवस्था ३ बाद १२ अशी झाली होती.

कर्णधार डुप्लेसिस आणि अनुभवी अब्राहम डिव्हिलियर्स यांनी आफ्रिकेच्या डावाची पडझड थांबवली. कसोटी पदार्पण करणाऱ्या बुमराहने दुसऱ्या सत्रात डिव्हिलियर्सचा त्रिफळा उडवून आपली पहिलीवहिली कसोटी विकेट मिळवली. डिव्हिलियर्सने ८४ चेंडूंमध्ये ६५ धावा करताना डुप्लेसिससह ११४ धावांची भागीदारी रचली. डुप्लेसिसही १०४ चेंडूंत ६२ धावा करून पंड्याच्या गोलंदाजीवर बाद झाला.

तुमची प्रतिक्रिया नोंदवा
टॅग्ज
अजून दाखवा

संबंधित लेख

Close
%d bloggers like this: