CricketSports

ICC U-19 वर्ल्ड कप: भारताची झिंबाब्वेवर मात

आयसीसी अंडर 19 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियानं आपली विजयी घोडदौड कायम ठेवली आहे. झिम्बाब्वेनं दिलेलं 155 धावांचं आव्हान भारताच्या सलामीवीरांनीच पूर्ण केलं आणि द्रविडच्या शिष्यांनी दहा विकेटनं दणदणीत विजय मिळवला.

माउंट माँगानुईः आयसीसी अंडर 19 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियानं आपली विजयी घोडदौड कायम ठेवली आहे. झिम्बाब्वेनं दिलेलं 155 धावांचं आव्हान भारताच्या सलामीवीरांनीच पार करून टाकलं आणि राहुल द्रविडच्या शिष्यांनी सलग तिसऱ्या मोठ्या विजयाची नोंद केली. त्यामुळे यंग टीम इंडियाची वर्ल्ड कपवरील दावेदारी आणखी भक्कम झाली आहे.

शुभम गिलच्या तडाखेबंद 90 धावा आणि हार्विक देसाईचं संयमी अर्धशतक या जोरावर टीम इंडियानं 22 व्या षटकातच विजय साकारला. 14 चौकार आणि एक षटकार ठोकून शुभमनं 59 चेंडूतच 90 धावा तडकावल्या, तर दुसरी बाजू लावून धरणाऱ्या हार्विकनं 8 चौकार आणि एक षटकाराच्या मदतीने 73 चेंडूत 56 धावांची खेळी केली.

अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेत पूर्ण तयारीनिशी उतरलेल्या भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया आणि पपुआ न्यू गिनी यांच्याविरुद्धचे सामने जिंकून उपांत्यपूर्व फेरीतील प्रवेश निश्चित केला होता. त्यामुळे झिम्बाब्वेविरुद्धचा सामना भारतासाठी खरं तर औपचारिकताच होती. पण, पृथ्वी शॉच्या संघाने जराही ढिलाई न दाखवता टिच्चून खेळ केला आणि दहा विकेट्सने दणदणीत विजय मिळवला.

सलामीच्या सामन्यात तगड्या ऑस्ट्रेलियाचा 100 धावांनी धुव्वा उडवून पृथ्वी शॉच्या शिलेदारांनी आपले इरादे स्पष्ट केले होते. त्यानंतर, दुसऱ्या सामन्यात त्यांनी पपुआ न्यू गिनी या तुलनेनं दुबळ्या प्रतिस्पर्ध्यांचा ‘खेळ खल्लास’ करून टाकला होता. स्वाभाविकच, झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात भारताचं पारडं जड होतं. याआधी भारत आणि झिम्बाब्वेच्या 19 वर्षांखालील संघांमध्ये चार सामने झाले होते आणि टीम इंडियानं विजयाचा चौकार लगावला होता. या लौकिकाला साजेशी कामगिरी करतच, भारतानं झिम्बाब्वेला डोकं वर काढण्याची संधीच दिली नाही. आधी अनुकूल रॉय (4 विकेट), अर्शदीप सिंग (2 विकेट) आणि अभिषेक शर्मा (2 विकेट) या गोलंदाज त्रिकुटाने झिम्बाब्वेला 154 धावांत गुंडाळलं आणि मग हार्विक-शुभम जोडीनं या पायावर विजयाचा कळस चढवला.

तीनही सामने जिंकल्यामुळे भारत ‘ब’ गटात अव्वल स्थानी आहे, तर ऑस्ट्रेलिया दुसऱ्या क्रमांकावर आहे.

तुमची प्रतिक्रिया नोंदवा
टॅग्ज
अजून दाखवा

संबंधित लेख

Close
%d bloggers like this: