Mumbai

कमला मिल कंपाऊंडमध्ये भीषण आग वाढदिवशीच खुशबूला मृत्यूने गाठलं .

कमला मिल कम्पाऊंडमध्ये ट्रेड हाऊस इमारतीला लागलेल्या भीषण आगीत 14 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 12 हून अधिक जखमी झाले आहेत.

kamala-mill-fire

मुंबई-  लोअर परळ येथील कमला मिल कम्पाऊंडमध्ये ट्रेड हाऊस इमारतीला लागलेल्या भीषण आगीत 14 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 12 हून अधिक जखमी झाले आहेत.  मृतांमध्ये 11 महिलांचा समावेश आहे. वन अबव्ह पबमध्ये आग लागून ती संपूर्ण कम्पाऊंडमध्ये पसरली.

खुशबू मेहता हिचा 28 डिसेंबर रोजी वाढदिवस होता. त्यानिमित्ताने कमला मिल्स कम्पाऊंडमधील हॉटेल मोजो ब्रिस्टो रेस्ताँ अॅण्ड पबमध्ये पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. दुर्दैवाने खुशबूला वाढदिवशीच मृत्यूने गाठले. पार्टीला तिचे मित्र आणि नातेवाईकही उपस्थित होते. मोठ्या थाटात वाढदिवस साजरा झाला. पण त्यानंतर आग लागली आणि पाहता पाहता हॉटेलचा सगळा परिसर आगीच्या भक्ष्यस्थानी सापडला.

कमला मिल कम्पाऊंडमधील अग्नितांडवात बहुतेकांचा मृत्यू गुदमरुन झाल्याचे केईएम हॉस्पिटलचे डॉ. राजेश डेरे यांनी सांगितले आहे. मृतांमध्ये 3 पुरुष आणि 11 महिलांचा समावेश आहे. त्यापैकी 8 मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत.

गुरुवारी रात्री सव्वा बारा वाजेच्या सुमारास वन अबव्ह पबला सुरुवातीला आग लागली त्यानंतर हॉटेल मोजेस ब्रिस्ट्रोला आणि लंडन टॅक्सी रेस्टोपबमध्ये आग पसरली. घटनेची माहिती मिळताच अग्नीशमन दलाचे जवान घटना घटनास्थळी पोहोचले. कुलिंग ऑफरेशन करून आगी विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. जवळपास अडीच ते तीन तासांनी आग आटोक्यात आली.

जखमींवर केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आगीचे कारण आद्याप स्पष्ट झालेले नाही. परंतु, शॉर्ट सर्कीटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. या प्रकरणी वन अबव्ह पबच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे. हितेश संघवी, जिगर संघवी आणि अभिजित मानकर यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आगीच्या घटनेमुळे कमला मिल कंपाऊंडमधला वीजपुरवठाही खंडीत करण्यात आला आहे. आगीमुळे रेस्तराँ आणि पबचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कमला मिल कंपाऊंडमध्ये टीव्ही 9 मराठी, टाइम्स नाऊ, मुंबई मिरर सारखी मीडिया हाऊस आहेत. अचानक लागलेल्या या आगीमुळे विविध कार्यालयातील कर्मचार्‍यांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, हॉटेल मोजो ब्रिस्ट्रो पूर्णतः शाकाहारी आहे. या हॉटेलमध्ये गुजराती, मारवाडी आणि सिंधी लोकांची गर्दी असते. मोजोच्या टेरेसवर प्लॅस्टिक आणि बांबूचे बांधकाम होते. त्या बांबूंना शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

मृतांची नावं :
प्रमिला
तेजल गांधी (वय वर्षे 36)
खुशबू मेहता (वय वर्षे 28)
विश्वा ललानी (वय वर्षे 23)
पारुल लकडावाला (वय वर्षे 49)
धैर्य ललानी (वय वर्षे 26)
किंजल शहा (वय वर्षे 21)
कविता धरानी (वय वर्षे 36)
शेफाली जोशी
यशा ठक्कर (वय वर्षे 22)
सरबजीत परेला
प्राची खेतानी (वय वर्षे 30)
मनिषा शहा (वय वर्षे 47)
प्रीती राजगीरा (वय वर्षे 41)

तुमची प्रतिक्रिया नोंदवा
टॅग्ज
अजून दाखवा

संबंधित लेख

Close
%d bloggers like this: