युसूफ पठाण उत्तेजक चाचणीत दोषी,बीसीसीआयने केलं निलंबित

नवी दिल्ली:  गेल्या अनेक दिवसांपासून टीम इंडियातून बाहेर असलेला अष्टपैलू खेळाडू युसुफ पठाणला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने निलंबित केलं आहे. पाच महिन्यांसाठी पठाणचं निलंबन करण्यात आलं आहे. 15 ऑगस्ट 2017 ते 14 जानेवारी 2018 च्या मध्यरात्रीपर्यंत हे निलंबन असणार आहे. म्हणजे निलंबनाचा अवधी संपायला केवळ 6 दिवस बाकी असताना याबाबतचं वृत्त समोर आलं आहे. डोपिंग नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी पठाणचं निलंबन करण्यात आलं होतं. त्यामुळे इंडियन प्रिमियर लिगमध्ये पठाण खेळणार की नाही हे अजून स्पष्ट होऊ शकलेलं नाही. पण निलंबनाचा कालावधी संपत असल्यामुळे तो आयपीएलमध्ये खेळण्याची शक्यता जास्त आहे.
गेल्या सत्रात युसुफ पठाण बडोदा रणजी टीमसाठी केवळ एक सामना खेळला होता. त्याने  ब्रोजिट नावाच्या एका औषधाचं सेवन केलं होतं. या औषधात प्रतिबंधित पदार्थांचा वापर होतो. कोणत्याही खेळाडूला हे औषध घेण्याआधी परवानगी घेणं आवश्यक असतं.  पण हे औषध घेताना युसुफ पठाणने किंवा बडोदा टिमच्या डॉक्टरांनीही परवानगी घेतली नव्हती. त्यामुळे उत्तेजक सेवन चाचणीत तो दोषी आढळला. त्यानंतर युसुफला बडोद्याने इतर सामन्यांमध्ये खेळू देऊ नये  असा आदेश बीसीसीआय़ने दिला होता.

युसूफ पठाण राष्ट्रीय क्रिकेटमद्ये बडोद्याच्या संघाचं प्रतिनिधीत्व करतो. 2012 नंतर मात्र युसूफ पठाणला भारतीय संघात स्थान मिळालेलं नाहीये. आतापर्यंत युसूफ पठाणने भारताचं 79 सामन्यांमध्ये प्रतिनिधीत्व केलं आहे. 2007  च्या टी-20 आणि 2011 च्या विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचा युसूफ पठाण सदस्य होता.

तुमची प्रतिक्रिया नोंदवा
CricketYusuf-pathan