‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट

मुंबई – ‘ठग्ज ऑफ हिंदुस्थान’ सिनेमाचं शूटिंग मंगळवारी (13 मार्च) जोधपूर येथे सुरू असताना बॉलिवूडमधील शहेनशाह अमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीत अचानक बिघाड झाला. त्यांच्या प्रकृतीची तपासणी करण्यासाठी मुंबईहून डॉक्टरांची टीम चार्टड विमानातून तातडीने जोधपूरला रवाना झाली होती. उपचारानंतर त्यांची प्रकृती आता उत्तम आहे. दुसरीकडे, अमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीत झालेला बिघाड बॉलिवूडसहीत त्यांच्या चाहत्यांमध्ये सर्वांच्या चिंतेचा विषय बनला आहे.

अमिताभ बच्चन यांचे फेसबुक पोस्ट 
अमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीविषय त्यांच्या चाहत्यांमध्ये बरीच अस्वस्थता निर्माण झाली होती. मात्र मंगळवारी उशीरा रात्री त्यांच्या फेसबुक पोस्टमुळे चाहत्यांना काही प्रमाणात का होईना पण दिलासा मिळाला. ‘कुछ कष्ट बढ़ा ,चिकिस्तक को चिकिस्ता के लिए बुलाना पड़ा, इलाज प्रबल , स्वस्थ हुए नवल ,चलो इसी बहाने , अपनों का पता तो चला ‘ असे फेसबुक पोस्ट त्यांनी केले आहे. या पोस्टसहीत त्यांनी आपल्या चाहत्यांचे आभार मानले आहेत.  दरम्यान, बिग बींच्या प्रकृतीत बिघाड होत असल्याचे वृत्त गेल्या काही दिवसांपासून वारंवार येत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, जोधपूरमध्येच राहून अमिताभ बच्चन डॉक्टरांकडून संपूर्ण उपचार घेणार आहेत, शिवाय सिनेमाचं शूटिंगदेखील पूर्ण करणार आहेत.

पत्नी जया यांनी सांगितलं बिग बींच्या आजारामागचं कारण 
महानायक अमिताभ बच्चन यांच्या पत्नी व  ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांनी त्यांची प्रकृती आता ठीक असल्याचे सांगत चाहत्यांना दिलासादायक बातमी दिली. मंगळवारी दिल्लीत माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी याविषयीची माहिती दिली. ‘अमितजींच्या प्रकृतीत आता सुधारणा आहे. ते बरे आहेत. त्यांना पाठ आणि मानदुखीमुळे त्रास झाला होता. सिनेमासाठी त्यांना देण्यात आलेल्या कपड्यांचे वजन अधिक असल्यामुळेच त्यांना हा त्रास झाला. इतर कोणतेही गंभीर कारण नसून, त्यांची प्रकृती उत्तम आहे. अमितजींनी संपूर्ण रात्र जागून पहाटे 5 वाजेपर्यंत सिनेमाचं शूटिंग केलं. काही अॅक्शन आणि थ्रिलर सीन्समुळे त्यांचे अंग दुखू लागले होते’, असं त्यांनी सांगितले.

 

तुमची प्रतिक्रिया नोंदवा