राहुल गांधींमुळेच माझा मुलगा वैमानिक: निर्भयाची आई

निर्भयाची आई आशा देवी यांनी एका वृत्तपत्राशी बोलताना सांगितले की, अमन (नाव बदललेले) हा आज फक्त राहुल गांधी यांच्यामुळेच वैमानिक होऊ शकला आहे. तो वैमानिक झाल्याने आमच्या कुटुंबाचे स्वप्न पूर्ण होऊ शकले आहे. निर्भयावर बलात्कार झाला, त्यावेळी अमन बारावीत शिकत होता. त्याला या प्रकरणामुळे धक्का बसला होता. पण, राहुल गांधी यांनी सतत त्याची भेट घेऊन त्याला मानसिकदृष्ट्या सक्षम केले. तसेच त्याचा शिक्षणाचा खर्चही उचलला. शिक्षण झाल्यानंतर त्याला लष्करात भरती व्हायचे होते. पण, राहुल गांधी यांनी त्याला वैमानिक होण्याचा सल्ला दिला. त्याला 2013 मध्ये रायबरेलीतील इंदिरा गांधी राष्ट्रीय उडाण अकादमीमध्ये प्रवेश मिळाला. रायबरेलीत राहण्यास गेल्यानंतर त्याला अनेक अडचणी आल्या. पण, त्याने त्यावर मात केली. सरावाच्या काळात तो सतत निर्भयाच्या खटल्याबाबत माहिती घेत होती. तसेच तो राहुल गांधींच्याही संपर्कात होता. त्यांनी त्याला कायम वैमानिकाचे प्रशिक्षण न सोडण्याचा सल्ला दिला. आता त्याचे प्रशिक्षण पूर्ण झाले असून, गुरुग्राममध्ये अंतिम प्रशिक्षण घेत आहे. आता तो लवकरच विमानाचे उड्डाण करू शकणार आहे. राहुल यांच्यासह त्यांची बहिण प्रियांकाही अमनला सतत आत्मविश्वास देत होती.

निर्भया बलात्कार प्रकरणातील सर्व आरोपींना दोषी ठरविण्यात आलेले आहे. यातील एक आरोपीचा कारागृहात मृत्यू झाला होता. तर, चौघांना फाशीची शिक्षा सुनाविण्यात आलेली आहे. एक अल्पवयीन आरोपी तीन वर्षांची शिक्षा भोगत आहे. या प्रकरणामुळे देशभर खळबळ उडाली होती.

तुमची प्रतिक्रिया नोंदवा