ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस :नदाल विजय

ग्रँडस्लॅम विजेतेपदाच्या मार्गातील अवघड अडथळे पार करीत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या राफेल नदालने अर्जेटिनाच्या दिएगो श्वार्ट्झमनविरुद्ध संघर्षपूर्ण विजय मिळवून ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली. याशिवाय ग्रिगोर दिमित्रोव, मरीन चिलीच व काईल एडमंड यांनीही उपांत्यपूर्व फेरी गाठली.

नदालने जवळपास चार तासांच्या लढतीनंतर श्वार्ट्झमनला ६-३, ६-७ (४-७), ६-३, ६-३ असे हरवले. दुसऱ्या सेटमध्ये नदालला परतीचे फटके व सव्‍‌र्हिसवर नियंत्रण ठेवता आले नाही. तिसऱ्या सेटमध्ये श्वार्ट्झमनला पाच वेळा सव्‍‌र्हिस ब्रेकची संधी मिळाली होती. पण त्याचा फायदा त्याला घेता आला नाही. हा सामना जिंकल्यामुळे जागतिक क्रमवारीतील त्याचे अव्वल स्थान कायम राहिले आहे. त्याच्यापुढे चिलीच याचे आव्हान असणार आहे. क्रोएशियाच्या चिलीचने स्पेनच्या पाब्लो कॅरेनो बुस्टाचा ६-७ (२-७), ६-३, ७-६ (९-७), ७-६ (७-३) असा रोमहर्षक लढतीत पराभव केला. इंग्लंडच्या एडमंडने इटलीच्या आंद्रेस सेप्पीवर ६-७ (४-७), ७-५, ६-२, ६-३ अशी मात केली. तिसऱ्या मानांकित ग्रिगोर दिमित्रोवने ऑस्ट्रेलियाच्या निक किर्गिओसची अनपेक्षित विजयाची मालिका खंडित केली. टायब्रेकपर्यंत सेट न्यायचा व तो जिंकायचा अशीच रणनीती उपयोगात आणत दिमित्रोवने हा सामना ७-६ (७-३), ७-६ (७-४), ४-६, ७-६ (७-४) असा जिंकला.

तुमची प्रतिक्रिया नोंदवा
Australian-openrafel-nadalsportstennis