National

ऑगस्टा वेस्टलँड घोटाळाप्रकरणी भारताला धक्का,इटलीच्या कोर्टाकडून आरोपी निर्दोष

vvipchopper

इटलीच्या एका न्यायालयाने बहुचर्चित ऑगस्टा वेस्टलँड या व्हीव्हीआयपींसाठीच्या हेलिकॉप्टर खरेदीतील घोटाळ्याप्रकरणी सोमवारी दोघांना निर्दोष ठरवले. लिओनार्दोचे दोन माजी अधिकारी जुसपे ओरसी आणि ब्रूनो यांना निर्दोष मुक्त केले. न्यायालयाच्या आदेशानुसार, सरकारी संरक्षण समूहाचे माजी प्रमुख आणि ऑगस्टा वेस्टलँडच्या हेलिकॉप्टर यूनिटचे प्रमुख राहिलेल्या ब्रूनो यांना पुराव्याअभावी निर्दोष ठरवण्यात आले. डिसेंबर २०१६ मध्ये इटलीच्या सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणी पुन्हा सुनावणी करण्याचे आदेश दिले होते. इटली न्यायालयाचा हा निर्णय भारताला मोठा धक्का असल्याचे समजते. याप्रकरणी भारतातही खटला चालू आहे. दरम्यान, सीबीआयने या निकालाविरोधात इटलीच्या सर्वोच्च न्यायालयात अपील करता येणार असल्याचे म्हटले आहे.

भारताने इटलीच्या सरकारी मालकीच्या फिनमेकॅनिका या कंपनीची उपकंपनी असलेल्या ऑगस्टा वेस्टलँड या कंपनीकडून ‘एडब्ल्यू 101’ प्रकारातील 12 हेलिकॉप्टर खरेदी करण्याचा करार 2010 साली केला. हा करार 3,546 कोटी रुपयांचा होता. त्यातील 8  हेलिकॉप्टर राष्ट्रपती, पंतप्रधान आणि अन्य अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या प्रवासासाठी तर 4 अन्य कारणांसाठी वापरली जाणार होती.
पूर्वीची रशियन एमआय-8 ही होलिकॉप्टर आता कालबाह्य ठरू लागल्याने ती बदलण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. 1999 साली प्रथम ही मागणी झाली. 2005 साली त्यासाठी निविदा जाहीर करण्यात आल्या. या पहिल्या निविदांमध्ये 6000 मीटर उंचीवर काम करू शकतील अशी हेलिकॉप्टर हवी असल्याची अट घालण्यात आली होती. उंचीची (सव्‍‌र्हिस सीलिंग) ही अट संरक्षण मंत्रालयाने 2006  साली शिथिल करून 4500 मीटरवर आणली. त्यामुळे या स्पर्धेतील अमेरिकेच्या सिकोस्र्की कंपनीच्या ‘एस-92 सुपरहॉक’ हेलिकॉप्टरची संधी हुकली असे म्हटले जाते. निवडीसाठीच्या या अटी बदलल्याने इटलीच्या ऑगस्टा वेस्टलँड कंपनीला फायदा झाला आणि अटी बदलण्यात हवाई दलाचे माजी प्रमुख एअर चीफ मार्शल एस. पी. त्यागी यांचा हात असल्याचा संशय आहे.

या व्यवहारात लाचखोरी झाल्याचं 2012 मध्ये समोर आलं. घोटाळ्याच्या गदारोळानंतर 2013 मध्ये तत्कालीन संरक्षण मंत्री ए के अँटोनी यांनी भ्रष्टाचार झाल्याचं कबूल करत, हा सौदाच रद्द केला होता. फिनमेकॅनिका आणि ऑगस्टा वेस्टलँड कंपनीने भारताकडून हे कंत्राट मिळवण्यासाठी इटली व भारतात अनेकांना सुमारे 423 कोटी रुपयांची लाच दिल्याचा संशय व्यक्त करून इटलीच्या अ‍ॅटर्नी जनरल कार्यालयाने चौकशी सुरू केली. सीबीआयने मार्च  2013 मध्ये 18  संशयितांविरोधात एफआयआर दाखल केली. सक्तवसुली संचालनालयानेही (ईडी) प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग अ‍ॅक्टअंतर्गत तपास सुरू केला.

भारताने 1 जानेवारी 2014 रोजी हा करार रद्द केला. तोपर्यंत करारातील 3 हेलिकॉप्टर भारताला मिळाली होती. करार रद्द होईपर्यंत भारताने कंपनीला 1620 कोटी रुपये दिले होते आणि जानेवारी 2014 मध्ये भारतीय बँकांमध्ये हमी म्हणून ठेवलेले 250 कोटी रुपये परत घेतले होते.
इटलीच्या ‘फिनमेक्कनिका’ कंपनीने 12 ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टरच्या सौद्यापोटी माजी वायुसेना प्रमुख एस. पी. त्यागी यांच्यासह त्यांच्या तीन नातेवाईंकाना लाच दिल्याचा आरोप आहे.

तुमची प्रतिक्रिया नोंदवा
टॅग्ज
अजून दाखवा

संबंधित लेख

Close
%d bloggers like this: