नागपुरमहाराष्ट्र राजकीय

सतीश चतुर्वेदी काँग्रेसमधून बडतर्फ

मुंबई : माजी मंत्री आणि पूर्व नागपूरचे माजी आमदार सतीश चतुर्वेदी यांना पक्षविरोधी कारवायांबद्दल पक्षातून बडतर्फ करण्यात आले आहे. प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी ही कारवाई केली.
अनेक वर्षे नागपूरचे राजकारण गाजविलेले चतुर्वेदी यांनी गेल्यावर्षी झालेल्या नागपूर महापालिका निवडणुकीत काँग्रेसच्या अधिकृत उमेदवारांविरुद्ध बंडखोर उमेदवार उभे करण्यास प्रोत्साहन दिल्याचा तसेच बंडखोरांचा प्रचार केल्याचा आरोप होता. त्यामुुळे पक्षशिस्तभंगाच्या तक्रारी त्यांच्याविरुद्ध पक्षनेतृत्वाकडे करण्यात आल्या होत्या. या तक्रारींची चौकशी करून प्रदेश काँग्रेसला अहवाल देण्यास नागपूर शहर काँग्रेस अध्यक्ष विकास ठाकरे यांना सांगण्यात आले होते. ठाकरे यांनी चतुर्वेदी यांना २३ जानेवारी २०१८ रोजी कारणे दाखवा नोटीस बजावली होती.
तथापि, चतुर्वेदी यांनी या नोटीशीकडे दुर्लक्ष केले व दिलेल्या मुदतीत खुलासादेखील केलेला नव्हता. त्यानंतर विकास ठाकरे यांनी चतुर्वेदींविरुद्ध असलेल्या तक्रारींची चौकशी केली व त्या बाबतचा अहवाल प्रदेश काँग्रेसकडे सोपविला होता. गेल्या वर्षीच्या महापालिका निवडणुकीत चतुर्वेदींनी बंडखोर उमेदवारांना उत्तेजन दिले व पक्षाच्या उमेदवारांना पराभूत करण्यासाठी ते कारणीभूत ठरले हे पुराव्यानिशी स्पष्ट होत असल्याचा अहवाल ठाकरे यांनी प्रदेश काँग्रेसला दिला होता. त्याच्या आधारे चतुर्वेदी यांना काँग्रेसमधून बडतर्फ करण्याची कारवाई प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी केली.

तुमची प्रतिक्रिया नोंदवा
टॅग्ज
अजून दाखवा

संबंधित लेख

Close
%d bloggers like this: