राष्ट्रीय

कडाक्याच्या थंडीत 1600 ते 1800 चिनी सैनिकांनी ठोकला तळ .

डोकलाममध्ये सिक्कीम-भूतान-तिबेट या ट्राय जंक्शनजवळच्या भागात चीनचे 1600 ते 1800 सैनिक तैनात आहेत.

chin

थंडीचा कडाका वाढत असताना चीनकडून डोकलाम भागातील गस्त वाढवण्यात आली आहे. चीनच्या १६०० ते १८०० सैनिकांनी डोकलाम भागात तळ ठोकला आहे. कडाक्याच्या थंडीत चिनी सैन्याने पहिल्यांदाच अशाप्रकारे डोकलाममध्ये वास्तव्य केले आहे. सिक्कीम-भूतान-तिबेट भागात चिनी सैन्याने दोन हेलिपॅड, चांगल्या दर्जाचे रस्ते आणि तंबू उभारले आहेत. सामरिकदृष्ट्या अतिशय संवेदनशील असलेल्या भागात चीनच्या हालचाली वाढल्या आहेत. तर चिनी सैन्याला कोणत्याही परिस्थितीत दक्षिणेकडे रस्त्याचे बांधकाम करु देणार नाही, अशी भारताची भूमिका आहे.

याआधीही डोकलामध्ये चिनी सैन्याचा मुक्काम असायचा अशी माहिती सुरक्षा दलातील सूत्रांनी दिली. ‘चीन आणि भूटान यांच्यातील वादग्रस्त डोकलाम प्रांतात पिपल्स लिबरेशन आर्मीचे सैन्य एप्रिल-मे आणि ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान मुक्काम करायचे. या भागातील चीनचे अस्तित्त्व दाखवण्यासाठी त्यांच्याकडून वादग्रस्त भागावर दावादेखील सांगितला जायचा. यानंतर चिनी सैन्य मागे जायचे,’ अशी माहिती संरक्षण दलातील सूत्रांनी दिली.

‘डोकलाम भागात भारत आणि चीनचे सैन्य जवळपास ७३ दिवस आमनेसामने उभे ठाकले होते. २८ ऑगस्ट रोजी हा तणाव निवळला. मात्र त्यानंतर पहिल्यांदाच चिनी सैन्याने या भागात तळ ठोकला आहे,’ असेही त्यांनी सांगितले. चीनकडून वादग्रस्त भागात शक्तिप्रदर्शन केले जाईल, असा धोक्याचा इशारा लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी काही दिवसांपूर्वी दिला होता. याआधी भारतीय सैन्याने डोकलाम भागातील चिनी लष्कराच्या उपस्थितीवर आक्षेप घेतला नव्हता. मात्र जूनमध्ये चिनी सैन्याने या भागात रस्त्याचे काम सुरु केल्यावर भारताने तीव्र आक्षेप नोंदवला होता.

चीनने व्यूहरचनात्मक उभारणी करत चुंबी खोऱ्यात पाय रोवले आहेत. हा भाग भूतान आणि सिक्कीमच्या मध्यभागी येतो. हा भाग सामरिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा आहे. भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये जवळपास अडीच महिने सुरु असलेला तणाव ऑगस्टमध्ये संपुष्टात आला. दोन्ही देशांच्या सैन्याने १५० मीटर मागे हटण्याचा निर्णय घेतल्याने या तणाव निवळला. त्यामुळे या भागात दोन्ही देशांचे सैन्य सध्या एकमेकांपासून ५०० मीटर दूर आहेत. डोकलाम तणाव संपुष्टात आल्यापासून चीनने या भागात रस्ते निर्मितीचे काम सुरु केलेले नाही.

तुमची प्रतिक्रिया नोंदवा
टॅग्ज
अजून दाखवा

संबंधित लेख

Close
%d bloggers like this: