नविन 10 रुपयांची नोट लवकरच येणार

भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) लवकरच दहा रुपयांच्या नवीन नोटा चलनात आणणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँक महात्मा गांधींच्या सीरिजमधल्या 10 रुपयांच्या नव्या नोटांमध्ये बदल करून बाजारात आणण्याच्या तयारीत आहे.  या नोटा चॉकलेट ब्राऊन म्हणजेच आत्ताच्या दहा रुपयांच्या नोटांपेक्षा थोड्या गडद रंगाच्या असतील. विशेष म्हणजे या नोटांच्या मागील बाजूवर ओडीशा येथील पूरीमधील जगप्रसिद्ध कोणार्क सुर्यमंदीराचे चित्र असणार आहे. समोरील बाजूस महात्मा गांधीचे चित्र असणाऱ्या सिरीजमधीच ही नोट असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

नवीन नोटांच्या डिझाइनला सरकारकडून मागील आठवड्यामध्ये होकार मिळाल्यानंतर आठवड्याभरात रिझर्व्ह बँकेने १०० कोटी रुपये किंमतीच्या नोटा छापल्या आहेत. याआधी २००५ साली दहा रुपयांच्या नोटांच्या डिझाइनमध्ये बदल करण्यात आला होता. मागील वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये २०० रुपयांच्या आणि ५० रुपयांच्या नवीन नोटा आरबीआयने चलनात आणल्या होत्या. त्यानंतर अवघ्या पाच महिन्यांमध्ये आरबीआय पुन्हा या नव्या दहा रुपयांच्या नोटा चलनात आणणार आहे. कमीत कमी मुल्यांच्या नोटा अर्थव्यवस्थेत राहण्याच्या उद्देशाने सरकार प्रयत्न करत असून नोटाबंदीनंतर सरकारने हजार रुपयांची नोट चलनातून हद्दपार केली आहे. याच कमी मुल्यांच्या जास्तीत जास्त नोटा चलनात ठेवण्याच्या हेतूनेच सरकारने या नवीन दहा रुपयांच्या नोटा छापल्याचे समजते.

तुमची प्रतिक्रिया नोंदवा
10 rupee