भाजपाला तिहेरी तलाक देणारं राजस्थान पहिलं राज्य, शत्रुघ्न सिन्हा यांचा घरचा आहेर

मुंबई- राजस्थानमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपाला जोरदार झटका बसला. राजस्थानमध्ये दोन लोकसभा आणि एक विधानसभेच्या जागेसाठी झालेल्या निवडणुकीमध्ये काँग्रेसने विजय मिळवला. भाजपाच्या या पराभवावर भाजपा नेते आणि खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. शत्रुघ्न सिन्हा यांनी ट्विट करत भाजपावर टीका केली. राजस्थान भाजपाला तिहेरी तलाक देणारं पहिलं राज्य बनलं आहे, असं त्यांनी म्हंटलं. ‘सगळे रेकॉर्ड्स तोडणारा सत्तारूढ पक्ष भाजपासाठी ब्रेकिंग न्यूज- भाजपाला तिहेरी तलाक देणारं राजस्थान पहिलं राज्य. अजमेर-तलाक, अलवर-तलाक, मांडलगड-तलाक. आमच्या विरोधकांनी चांगल्या मतांनी ही निवडणूक जिंकली. आमच्या पक्षाला जोरदार झटका दिला आहे, असं ट्विट शत्रुघ्न सिन्हा यांनी केलं. शत्रुघ्न सिन्हा यांनी आणखी एक ट्विट करत भाजपाला सतर्क राहण्याचा सल्ला दिला. ‘देर आए दुरुस्त आए, नाहीतर हे विनाशकारी निकाल टाटा-बाय बाय करण्याचेही असू शकतात. जागे व्हा, जय हिंद!, असं त्यांनी दुसऱ्या ट्विटमध्ये म्हंटलं.

दुसरीकडे भाजपाचे आमदार घनश्याम तिवारी यांनीही राजस्थानमधील पराभवामुळे राज्यातील वसुंधरा राजे सरकारवर टीका केली. राजस्थानमधील पराभवला नरेंद्र मोदी सरकार आणि वसुंधरा राजे सरकार जबाबदार असल्याचं त्यांनी म्हंटलं. लोकांनी राजे आणि केंद्र सरकारला शिक्षा दिली आहे, अशी टीका त्यांनी केली. इतकंच नाही, तर भाजपाच्या पराभवावर करणी सेनेनेही आनंद साजरा केला. जनतेने करणी सेनेच्या संघर्षाला दाद देऊन भाजपाच्या विरोधात मतदान केल्याचं करणी सेनेनं म्हंटलं.

तुमची प्रतिक्रिया नोंदवा
BJPrajashthanshatrughan sinhatripple talak