राहुल केवळ हिंदूच नाही, तर जानवेधारी हिंदू: काँग्रेस

प्रसिद्ध सोमनाथ मंदिरास आज भेट देणाऱ्या कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे नाव मंदिरातील नोंदवहीत “बिगर हिंदू’ गटात नोंदविण्यात आल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. भाजपने राहुल गांधी यांच्या हिंदू असण्यावरच प्रश्‍नचिन्ह उपस्थित केल्यानंतर कॉंग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी या वादामध्ये आणखी तेल ओतले. राहुल केवळ हिंदूच नाही, तर जानवेधारी हिंदू असल्याचे वक्तव्य त्यांनी केल्याने पुन्हा हा वाद चिघळला आहे.

राहुल यांचे आजचे सोमनाथदर्शन वादाच्या भोवऱ्यात अडकले. त्यांचे नाव “बिगर हिंदू’ भाविकांच्या यादीमध्ये नोंदले गेल्यानंतर कॉंग्रेस आणि भाजप हे दोन्ही पक्ष आमने सामने आले. राहुल यांनी “बिगर हिंदू’साठीच्या रजिस्टरमध्ये स्वाक्षरीच केली नव्हती, असा दावा दीपेंद्र हुडा यांनी केला असून, याच रजिस्टरमध्ये राहुल हे आपले नाव राहुल गांधीजी असे का लिहितील, असा सवालही त्यांनी केला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अहमद पटेल आणि कॉंग्रेसचे माध्यम समन्वयक मनोज त्यागी यांनी या भाविकांच्या नोंदवहीत नोंदणी केली होती.
काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी तात्काळ पत्रकार परिषद घेऊन हा खुलासा केलाय. त्यासाठी त्यांनी राहुल गांधींचे, राजीव गांधींना अग्नी देतानाचे जानवं घातलेले फोटो पुरावा म्हणून सादर केलेत. गुजरातमध्ये भाजपकडे विकासाचा मुद्दा नसल्यानेच ते राहुल गांधींच्या धर्माचा वाद उकरून काढताहेत. असंही सुरजेवाला यांनी म्हटलंय.
दरम्यान, गांधी फॅमिलीचे कट्टर विरोधक सुब्रमन्यम स्वामी यांनी राहुल गांधी हे धर्माने ख्रिश्चनच असल्याचा दावा केलाय. त्यासाठी त्यांनी दहा जनपथ नजीक एक चर्च देखील बांधून घेतल्याचा दावा केलाय. राहुल गांधींना ख्रिश्चन म्हणून घेण्यास लाज वाटते का ? अशी मुक्ताफळंही सुब्रमन्यम स्वामी यांनी उधळलीत. दरम्यान, या सगळ्या वादाच्या पार्श्वभूमीवर स्वतः राहुल गांधी मात्र, मी शिवभक्त असल्याचं म्हटल्याचं यापूर्वीच स्पष्ट केलंय.

तुमची प्रतिक्रिया नोंदवा
gujratelectionrahulgandhisomnathtemple