नितीन गडकरी यांच्याकडून महाराष्ट्रात निधीचे पाट

राज्याच्या राजकारणात परतणार नसल्याचे मनोगत

आता आपण दिल्लीत चांगले रमलो आहे, केंद्रात मंत्री म्हणून काम करताना जात, धर्म, भाषा, प्रांत बघितला जात नाही, असे सांगतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात महत्त्वाची खाती संभाळणाऱ्या नितीन गडकरी यांनी महाष्ट्रात मात्र निधी पाट सोडले आहेत. आपला पाच वर्षांचा कार्यकाल पूर्ण करताना राज्यातील पाटबंधारे, सागरी मार्ग, महामार्ग इत्यादी प्रकल्पांची पाच लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची कामे मार्गी लावणार, असा दावा त्यांनी केला. राज्याच्या राजकारणात परतणार नसल्याचे मनोगत त्यांनी व्यक्त केले.

मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीने आयोजित केलेल्या वार्तालाप कार्यक्रमात गडकरी बोलत होते. जलसंपदा, भूपृष्ठ वाहतूक, नौकानयन अशी महत्त्वाची खाती त्यांच्याकडे आहेत. केंद्रातील जबाबदारी महत्त्वाची आहे, असे सांगत असताना, राज्यात १८ वर्षे विधान परिषदेचे सदस्य, युती सरकारमध्ये मंत्रिपद संभाळण्याची संधी मिळाली, अशा जुन्या आठवणींना उजाळा द्यायला ते विसरले नाहीत.

महाराष्ट्रातच २ लाख ८० हजार कोटी रुपयांची राष्ट्रीय महामार्गाची कामे चालू आहेत. आधीच्या सरकारच्या काळात ५ हजार ७०० कि.मी. लांबीचे महामार्ग होते. गेल्या दोन वर्षांत १६ हजार ७३६ कि.मी. लांबीचे रस्ते बनविण्यात आले. ५० टक्क्य़ांपेक्षा जास्त कामे झालेले परंतु निधीअभावी बंद पडलेल्या पाटबंधारे प्रकल्पांची ७५ हजार कोटी रुपयांची कामे सुरू आहेत. नदी जोड प्रकल्पाची ४० हजार कोटींची कामे हाती घेण्यात आली आहेत. महामार्गालगत १६७ पूलवजा बंधारे बांधण्याची योजना आहे. त्यामुळे पाण्याचा साठा होईल.

आपण दिल्लीत चांगले रमलो आहे, त्यामुळे राज्याच्या राजकारणात परतण्याचा विचार नाही, अशी मन की बात त्यांनी बोलून दाखविली.

पोर्ट ट्रस्टच्या जमिनीवर उद्यान

नितीन गडकरी यांनी राज्यात सध्या सुरू असलेल्या आणि भविष्यात राबविण्यात येणाऱ्या काही विकास योजनांची जंत्रीच जाहीर केली. नवी मुंबई विमानतळ जलमार्गाने जोडण्याचा प्रस्ताव आहे. अलिबाग-वडखळ रस्त्याचे रुंदीकरण करणार. पुणे-सातारा सहा पदरी मार्गाचे काम सुरू आहे. मुंबई-गोवा मार्ग पुढील मार्चपर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. मुंबई-गोवा सागरी मार्ग तयार करण्याचा मानस आहे, त्याचा प्रकल्प अहवाल तयार करण्यास सांगण्यात आले आहे. मुंबई पोर्ट ट्रस्टच्या साडेतीनशे हेक्टर जमिनीवर उद्यान बनविण्याचा प्रस्ताव आहे. मुंबईतील नागरिकांना या ठिकाणी शुद्ध हवा मिळेल, पाणी मिळेल, चालता येईल, यासाठी असे उद्यान बनविण्याचा मानस आहे, असे ते म्हणाले.

तुमची प्रतिक्रिया नोंदवा