लालूप्रसाद दोषी

राष्ट्रीय जनता दलाचे सुप्रीमो आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांना चारा घोटाळ्याशी निगडीत चाईबासा कोषागार घोटाळ्याप्रकरणी रांची येथील सीबीआयच्या विशेष न्यायालयाने दोषी ठरवले. शिक्षेची सुनावणी न्यायालयाने केलेली नाही. चारा घोटाळ्यातील हे तिसरे प्रकरण आहे. याप्रकरणी बिहारचे माजी मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्रा यांनाही दोषी ठरवण्यात आले आहे. चाईबासा घोटाळ्याप्रकरणी न्यायालयाने ५६ आरोपींपैकी ५० जणांना दोषी तर सहा जणांना निर्दोष ठरवण्यात आले.

दुसरीकडे लालूप्रसाद यादव यांना दोषी ठरवण्यात आल्यानंतर आरजेडीचे ज्येष्ठ नेते रघुवंशप्रसाद सिंह यांनी चारा घोटाळ्यातील सर्व निर्णयांविरोधात उच्च न्यायालयात अपील करणार असल्याचे सांगितले. लालूप्रसाद यांना चारा घोटाळ्यातील देवघर कोषागारशी निगडीत एका प्रकरणात शिक्षा सुनावण्यात आल्यामुळे ते सध्या रांची येथील बिरसा मुंडा तुरूंगात कैदेत आहेत. चाईबासाची सुनावणी १० जानेवारीला पूर्ण झाली होती. माजी उपमुख्यमंत्री व लालूप्रसाद यांचे चिरंजीव तेजस्वी यादव यांनीही हा भाजप, राष्ट्रीय स्वंयसेवक संघ आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा कट असल्याचा आरोप करत याविरोधात उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचे माध्यमांशी बोलताना म्हटले.

तुमची प्रतिक्रिया नोंदवा
Chara GhotalaLau PrasadRanchi