जिग्नेश मेवाणी-उमर खालिदवर पुण्यात गुन्हा दाखल .

कालच्या महाराष्ट्र बंदनंतर आमदार जिग्नेश मेवाणी आणि विद्यार्थी उमर खालिद यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे येथील शनिवार वाड्यावर झालेल्या एल्गार परिषदेत चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंगळवारी अक्षक बिक्कड आणि आनंद दौंड नावाच्या दोन युवकांनी पुणे येथील डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये जिग्नेश मेवाणी आणि उमर खालिद यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय. पुणे येथे शनिवार वाड्यावर झालेल्या कार्यक्रमात भडकाऊ भाषण केल्याचा आरोप जिग्नेश मेवाणी आणि उमर खालिद यांच्यावर लावण्यात आले आहे्त.

दुसरीकडे, हिंदू आघाडीच्या आधी पेशव्यांच्या वंशजांनी देखील हा कार्यक्रम शनिवारवाड्यावर घेण्यास विरोध केला होता. पण महापौर मुक्ता टिळक यांनी परिषदेला सांस्कृतिक कार्यक्रम म्हणून महापालिकेने परवानगी दिली होती.

मुंबईत आज (4 जानेवारी) छात्र भारतीच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारण्यात आली. त्यामुळे पोलिस आणि आयोजकांमध्ये बाचाबाची झाली. या कार्यक्रमातही जिग्नेश मेवाणी आणि उमर खालिद यांची भाषणं होणार होती. मात्र पोलिसांनी या कार्यक्रमाला परवानगी दिलेली नाही.

भीमा-कोरेगाव हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर काल महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला होता. त्यावेळी मुंबईत कलम 144 लागू करण्यात आलं होतं. त्यामुळे मुंबईत जमावबंदी आहे, कार्यक्रम करता येणार नाही, असं पोलिसांनी आयोजकांना सांगितलं. मात्र आम्ही आधीच कार्यक्रमाचं नियोजन केलं आहे, आता कार्यक्रम रद्द करु शकत नाही, असं म्हणत कार्यकर्त्यांनी पोलिसांनी हुज्जत घातली.

तुमची प्रतिक्रिया नोंदवा
Jignesh-MevaniUmar-Khalid.