अमरावती मार्गावर वाहनाच्या धडकेत वाघिणीचा मृत्यू .

जंगलातला वाघ आपल्या शहराच्या जवळ येतो आहे. शुक्रवारी ज्या ठिकाणी अमरावती मार्गावर वाघाचा अपघाती मृत्यू झाला ते ठिकाण नागपूरच्या सीमेपासून म्हणजे आपल्या विद्यापीठ परिसरापासून फक्त १५ कि.मी. अंतरावर आहे. नागपूर – अमरावती राष्ट्रीय  महामार्ग क्रमांक – ६ वरील बाजारगाव परिसरात असलेल्या पेपर मिल जवळील घुलीवाला पुलावर शुक्रवारी सायंकाळी  ७.३० वाजताच्या सुमारास घडली.

शुक्रवारी सायंकाळी ७.३० च्या सुमारास कुणातरी अज्ञात वाहनाने धडक दिल्याने वाघाचा मृत्यू झाला. अर्थात हे वाहन जंगलात गेले नव्हते तर वाघ त्या मार्गावर आला होता. पण वाघ मार्गावर येतो कसा? त्याला अशा ठिकाणी येण्याची भीती कां वाटत नाही? याचाही गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. काही वर्षांपूर्वी बेस्याजवळ हरिवेळा येथे एका घरात बिबट्या घुसला होता. हे अंतर मानेवाडा चौकापासून फक्त ६-७ कि.मी. आहे. चार वर्षापूर्वी बेसा परिसरात रात्री काहींना अस्वल दिसले होते. वन्यप्राणी मानवी वस्तीत येणे हे चांगले लक्षण नाही. मात्र बिबट्या व वाघ यांच्यात फरक आहे. बिबट्या छोट्या प्राण्यांची शिकार करण्याकरिता मानवी वस्तीत येऊ शकतो. वाघ सहसा येत नाही. याबाबत वन्यजीव प्रेमी डॉ. जेरिल बानाईत म्हणाले की, वाघ मानवी वस्तीच्या जवळ येत आहे हे खरे, मात्र तो मानवाला खूप ‘फॅमिलियर’ होत असल्याचे हे लक्षण आहे. मात्र वाघ आणि मानवाची मैत्री होणे चुकीचे आहे. पूर्वी जंगलात त्याला नैसर्गिक वातावरण असायचे. पण आता जंगल सफारी किंवा अन्य काही प्रकारांमुळे माणसे, वाहने यांचे दर्शन त्यालाही वरचे वर होऊ लागले आहे. त्यामुळेच मानवी वावर त्याच्या परिचयाचा होत आहे. मग जंगलाच्या बाहेर एखाद्या वर्दळीच्या रस्त्यावर येताना त्याला भीती वाटत नाही. खरे म्हणजे ज्या परिसरात या वाघाचा अपघाती मृत्यू झाला त्या परिसरात तो गेल्या काही दिवसात अनेकांना दिसला होता. प्रत्येक वाघाला रेडिओ कॉलर लावले तर तो नेमका कुठे आहे हे कळू शकते आणि तो जंगलाच्या हद्दीबाहेर जात असेल तर त्याला रोखण्याचे प्रयत्न करता येऊ शकतात. या मार्गालगतच्या जंगलात त्याचा वावर असल्याचे कळले असताना वन विभागाने त्याला तेथून दुसरीकडे नेले असते तरी या वाघाचा असा दुर्दैवी मृत्यू झाला नसता, असे डॉ. जेरिल म्हणाले.

 

तुमची प्रतिक्रिया नोंदवा
casekillingtiger