छोटा राजनला ठार करण्याचा दाऊदचा कट फसला, दाऊदने रचलं होतं .

तिहार तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या छोटा राजनची तुरुंगातच हत्या करण्याचा कट अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमने आखला होता. स्थानिक गुंडांच्या मदतीने ही हत्या घडवून आणण्याचे दाऊदचे षडयंत्र होते, अशी धक्कादायक माहिती उघड झाली आहे. मात्र तिहार प्रशासनाला त्याची माहिती मिळताच त्यांनी हा कट उधळून लावल्याचं सूत्रांनी सांगितलं.

दिल्लीचा टॉप गँगस्टर नीरज बवाना याने डी कंपनीच्या सांगण्यावरून छोटा राजनची हत्या करण्याचं षडयंत्र रचलं होतं. पण त्याच्या एका सहकाऱ्याने दारुच्या नशेत या कटाची माहिती दिली आणि हे षडयंत्र उधळले गेले. बवानाच्या या सहकाऱ्याची नोव्हेंबरमध्ये तिहारमधून सुटका झाली. त्यानंतर या षडयंत्राची माहिती समोर आल्याचं सूत्रांनी सांगितलं.

छोटा राजनवर दाऊदच्या गुंडांनी हल्ला करू नये म्हणून त्याला अति सुरक्षित तुरुंगात ठेवणे गरजेचे होते. म्हणून छोटा राजनला मुंबई आणि महाराष्ट्राच्या तुरुंगात ठेवण्यात आले नाही. तिहारमध्येही त्याला जेल नंबर दोनमधील शेवटच्या कोठडीत ठेवण्यात आले आहे. मात्र स्थानिक गुंडाच्या मदतीने छोटा राजनला मारण्याचं दाऊदनं षडयंत्र रचल्याची माहिती मिळाल्यानंतर बवानाला दुसरीकडे हलविण्यात आलं. त्याला हाय रिस्क वॉर्डात ठेवण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वीच त्याच्या बराकीतून मोबाइल जप्त करण्यात आले होते. या षडयंत्राची माहिती मिळाल्यानंतर छोटा राजनच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. त्याच्या सुरक्षेसाठी विशेष सुरक्षा रक्षक आणि स्वयंपाकी ठेवण्यात आले आहेत, अशी माहिती तुरुंग प्रशासनाच्या सूत्रांनी दिली.

तुमची प्रतिक्रिया नोंदवा
rajan