श्रीलंकेसमोर 410 धावांच्या आव्हानाचा.

दिल्ली : विराट कोहलीच्या टीम इंडियासाठी दिल्ली कसोटीत विजयाचं दार किलकिलं झालं आहे. या कसोटीत भारतानं श्रीलंकेला विजयासाठी 410 धावांचं लक्ष्य दिलं होतं. पण श्रीलंकेची चौथ्या दिवसअखेर तीन बाद 31 अशी उडालेली घसरगुंडी पाहता, दिल्ली कसोटीत टीम इंडियाचा विजय निश्चित मानला जात आहे.

मोहम्मद शमीनं सलामीच्या समरविक्रमाची विकेट काढून श्रीलंकेला पहिला धक्का दिला. मग रवींद्र जाडेजानं करुणारत्ने आणि लकमलला माघारी धाडून श्रीलंकेची अवस्था आणखी बिकट केली. त्याआधी, टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनं भारताचा दुसरा डाव पाच बाद 246 धावांवर घोषित केला.

भारतानं श्रीलंकेचा पहिला डाव 373 धावांत गुंडाळून पहिल्या डावात 163 धावांची आघाडी घेतली होती. त्यामुळं दिल्ली कसोटीत भारताची एकूण आघाडी 409 धावांची झाली.

टीम इंडियाला आघाडी मिळवून देण्यात शिखर धवन, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी मोलाची भूमिका बजावली. धवननं ६७ धावांची, पुजारानं ४९ धावांची, विराटनं ५० धावांची, तर रोहितनं नाबाद ५० धावांची खेळी उभारली.

सलामीवीर मुरली विजय आणि तिसऱ्या क्रमांकावर बढती देण्यात आलेला अजिंक्य रहाणे स्वस्तात माघारी परतले. त्यामुळं भारताची दुसऱ्या डावात दोन बाद २९ अशी घसरगुंडी उडाली होती. त्या परिस्थितीत धवन आणि पुजारानं तिसऱ्या विकेटसाठी ७७ धावांची भागीदारी रचून भारतीय डावाला आकार दिला. पुजारानं पाच चौकारांसह ४९ धावांची, तर धवननं पाच चौकार आणि एका षटकारासह ६७ धावांची खेळी उभारली.

दरम्यान श्रीलंकेचा पहिला डाव 373 धावांत संपुष्टात आला. श्रीलंकेनं कालच्या 9 बाद 356 या धावसंख्येत केवळ 17 धावांची भर घातली. ईशांत शर्मानं कर्णधार दिनेश चंडिमलला माघारी धाडत भारताला पहिल्या डावात 163 धावांची आघाडी मिळवून दिली. चंडिमलनं 21 चौकार आणि एका षटकारासह 164 धावांची दमदार खेळी उभारली.

भारताकडून ईशांत शर्मा, रविचंद्रन अश्विननं प्रत्येकी तीन तर मोहम्मद शमी आणि रविंद्र जाडेजानं दोन प्रत्येकी दोन फलंदाजांना माघारी धाडलं. दरम्यान टीम इंडियानं दुसऱ्या डावात मुरली विजयची आणि रहाणेची विकेट गमावताना 34 धावा जमवल्या आहेत.

 

 

तुमची प्रतिक्रिया नोंदवा
team-india-cricket