सोनई हत्याकांड : सहा दोषींना फाशीची शिक्षा

अहमदनगर जिल्ह्यातील सोनई येथील तिहेरी हत्याकांड प्रकरणी दोषी असलेल्या सहाजणांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तसेच २० हजार रूपयांचा दंडही या सगळ्यांना ठोठावण्यात आला आहे. जातीयता ही एड्ससारखी समाजात पसरू नये म्हणून या आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी आम्ही केली होती, जी न्यायालयाने मान्य केली. अशी माहिती विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी दिली आहे. २०१३ मध्ये तीन दलित युवकांची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली होती. त्याचप्रकरणी सहाजणांना नाशिक सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे.

सोनईतील सचिन धारू (२४) या तरुणाचे पोपट उर्फ रघुनाथ विश्वनाथ दरंदलेच्या (४८) मुलीशी प्रेमसंबंध होते. ते विवाह करणार असल्याचे समजल्यावर मुलीच्या कुटुंबीयांनी सचिनच्या हत्येचा कट रचला. शौचालयाच्या टाकीची सफाई करण्याच्या बहाण्याने त्यांनी सचिनसह संदीप थनवार, सागर उर्फ तिलक कंडारे यांना दरंदले वस्तीवर बोलावले. तिथे त्या तिघांची अत्यंत अमानूषपणे हत्या करण्यात आली. हत्या करणारे ऊस बागायतदार होते. हत्या झालेले मेहतर समाजातील सफाई कामगार होते. या हत्याकांडाने राज्यभरात खळबळ उडाली होती. सोमवारी न्यायालयाने याप्रकरणात पोपट उर्फ रघूनाथ दरंदले, रमेश दरंदले, प्रकाश दरंदले, गणेश उर्फ प्रवीण दरंदले, संदीप कुल्हे, अशोक नवगिरेला दोषी ठरवले होते.

तुमची प्रतिक्रिया नोंदवा
ahamadnagarsanoisanoitriplemurdercase