महाराष्ट्र महाराष्ट्रमुंबईराजकीय

सत्तेसाठी ममता बॅनर्जींना ईव्हीएम घोटाळा करावा नाही लागला, उद्धव ठाकरेंचा भाजपाला टोला

केंद्रातील मोदी सरकारला सातत्याने लक्ष्य करणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची गुरुवारी भेट झाली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

मुंबई –  केंद्रातील मोदी सरकारला सातत्याने लक्ष्य करणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची गुरुवारी  भेट झाली.  या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. केंद्रातील मोदी सरकारला विरोध या मुद्यावर हे दोन्ही नेते एकत्र येणार असल्याचे बोलले जात आहे.  त्यामुळे या भेटीने विविध राजकीय चर्चा रंगल्या आहेत. मित्रपक्ष भाजपानंही शिवसेनेवर ममता भेटीबाबत टीका केली आहे. यावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून भाजपाला टोला हाणलाय.

”ममता बॅनर्जी यांना भेटताच आमच्याच मित्रवर्यांची राजकीय आतडी वळवळू लागली व आम्ही ममतांना भेटून मोठेच पाप केले असे ते सांगू लागले. ज्वलंत हिंदुत्वाचे तथाकथित राखणदार मुस्लिमधार्जिण्या ममतांच्या वळचणीला गेल्याची बोंब या मंडळींनी ठोकली”, अशा शब्दांत उद्धव यांनी टीका केली आहे. शिवाय,  25 वर्षे रुजलेली लालभाईंची राजवट उलथवून टाकण्याचे काम या वाघिणीने केले. त्यासाठी तिला ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा करावा लागला नाही व पैशांनी मते विकत घ्यावी लागली नाहीत, असा टोलादेखील त्यांनी हाणला आहे.

काय आहे आजचे सामना संपादकीय?

होय, आम्ही प. बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेस पक्षाच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांची भेट घेतली. आम्ही श्रीमती बॅनर्जी यांना भेटल्याबद्दल कुणाच्या पोटात ढवळाढवळ सुरू झाली असेल तर तो त्यांचा दोष आहे. ममता बॅनर्जी या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आहेत. ममता या अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीत महत्त्वाची भूमिका बजावीत होत्या. वाजपेयींच्या सरकारमध्येही त्या होत्याच. वाजपेयी तर त्यांना मुलीसमान मानत होते व ममतादीदींनी प. बंगालात भाजपला सोबत घेऊन निवडणुका लढवाव्यात असे श्री. मोदी व अमित शहा यांचे मनसुबे होते, पण ममता यांनी ते मान्य केले नाही व त्यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवून विधानसभा-लोकसभा निवडणुकांत अतिप्रचंड असे यश मिळविले. ममता बॅनर्जी यांच्या अनेक भूमिका वादग्रस्त असतील व शिवसेनेच्या विचारधारेशी जुळणाऱ्या नसतील, पण शिवसेनेने ज्यांच्याशी सातत्याने लढे दिले त्या ‘लालभाईं’ना प. बंगालातून समूळ नष्ट करण्याचे काम ममता व त्यांच्या तृणमूल काँग्रेसनेच केले आहे. जे काँग्रेस किंवा भारतीय जनता पक्षाला जमले नाही ते प. बंगालात ममता यांनी करून दाखवले. २५ वर्षे रुजलेली लालभाईंची राजवट उलथवून टाकण्याचे काम या वाघिणीने केले. त्यासाठी तिला ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा करावा लागला नाही व पैशांनी मते विकत घ्यावी लागली नाहीत.

जनतेने मोठय़ा विश्वासाने ममतांकडे प. बंगालचे नेतृत्व दिले. प. बंगालात त्यांच्या नेतृत्वाखाली विकास होऊ नये व या राज्याची आर्थिक कोंडी व्हावी यासाठी अथक प्रयत्न सुरू आहेत. एखाद्या राज्यातील सरकार आपल्या मताचे नाही म्हणून त्या राज्याची कोंडी करून पीछेहाट करणे हे योग्य नाही. ते राज्य शेवटी हिंदुस्थानचाच भाग असते व त्यामुळे देशाचाच विकास खुंटतो. इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे शिवसेनेचा बांगलादेशी घुसखोरांना विरोध आहे व राहणारच, पण बांगलादेशी व बंगाली नागरिक यात फरक आहे. ममता बॅनर्जी यांना भेटताच आमच्याच मित्रवर्यांची राजकीय आतडी वळवळू लागली व आम्ही ममतांना भेटून मोठेच पाप केले असे ते सांगू लागले. ज्वलंत हिंदुत्वाचे तथाकथित राखणदार मुस्लिमधार्जिण्या ममतांच्या वळचणीला गेल्याची बोंब या मंडळींनी ठोकली. ज्वलंत हिंदुत्वाचे आम्ही राखणदार आहोतच. शिवाय आमचे हिंदुत्व ‘वारा’ येईल तसे पाठ फिरवीत नाही व सरडय़ाप्रमाणे रंगही बदलत नाही. ‘बाबरी’चे घुमट पडताच ‘काखा’ वर करून शिवसेनेकडे बोट दाखविणाऱ्या रणछोडदास हिंदुत्ववाद्यांची अवलाद तर आम्ही नक्कीच नाही. दोन वर्षांपूर्वी अफगाणिस्तानहून येताना पंतप्रधान मोदी मध्येच पाकिस्तानात उतरले होते व पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ यांची ‘गळाभेट’ घेऊन त्यांच्याशी ‘चाय पे चर्चा’ही केली होती. पाकिस्तानसारख्या

कट्टर शत्रुराष्ट्राच्या प्रमुखाला असे ‘अचानक’ भेटण्याचे कारण काय होते, त्यातून नेमके काय साध्य झाले यावर त्यावेळी बरीच चर्चा झाली. पुन्हा या भेटीमुळे पाकडय़ांचे आपल्याशी असलेले शत्रुत्व त्या चहाच्या कपात विरघळून गेले असेही झाले नाही. तरीही सध्याच्या सरकारमधील हिंदुत्ववाद्यांनी मोदी यांच्या या ‘सरप्राइज व्हिजिट’च्या कौतुकाचे ढोल बडविले होते. मात्र आता देशातील एका प्रमुख राज्याच्या मुख्यमंत्री असलेल्या ममता बॅनर्जी यांना आम्ही भेटलो तर या मंडळींचा पोटशूळ उठत आहे. आम्ही ममतांच्या वळचणीला गेल्याची बोंब ठोकून जे स्वतःचा कंडू शमवीत आहेत त्यांनी जम्मू-कश्मीरात मेहबुबा मुफ्तीबरोबर ‘हिरव्या गालिचा’वर कोणती वळचण टाकली आहे? तिकडे पाकिस्तानधार्जिणे व फुटीरतावाद्यांबरोबर सत्तेचे लोणी खायचे व इथे मात्र स्वतःच्याच बगला खाजवून दुसऱ्यांना मुस्लिमधार्जिणे ठरवायचे. गोध्राकांडानंतर मोदी यांच्याविरोधात उघड भूमिका घेत वाजपेयी सरकारमधून राजीनामा देणारे रामविलास पासवान आज तुमच्याच चटईवर येऊन झोपले आहेत ना? कश्मीरातील हिंदू पंडित अजूनही निराधार व निर्वासितांचेच जिणे जगत आहेत आणि अयोध्येतील श्रीरामही वनवासात आहेत. शिवसेनेच्या नावाने बोटे मोडण्याआधी जरा या सर्व हिंदुत्ववादी विषयांकडे ‘ममते’ने बघा! होय, आम्ही ममतांना भेटलो. ज्यांनी पाकधार्जिण्या मेहबुबाशी संगत केली त्यांनी तरी आमच्याकडे बोटे दाखवू नयेत.

तुमची प्रतिक्रिया नोंदवा
अजून दाखवा

संबंधित लेख

Close
%d bloggers like this: