नागपुरविदर्भ

शहरात तापमानात वेगाने घसरण, थंडी सुरू

रात्रीच्यावेळी गरम कपडे घालून बाहेर पडणाऱ्यांची संख्याही आता हळूहळू वाढलेली दिसून येत आहे.

Commuters are seen on a cold and foggy morning in Nagpur, India,

शहरातील तापमानात गेल्या आठवडाभरापासून दररोज एका अंशाने घट होत असून बुधवारी रात्रीचे तापमान १४.३ अंशावर आले. त्यामुळे गेल्यावर्षी नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवडय़ात ९.८ अंश सेल्सिअसपर्यंत घसरलेला पारा यावर्षी देखील त्याच पातळीवर जाण्याची शक्यता आहे.

नागपूरसह विदर्भात उत्तरेकडील थंड आणि कोरडय़ा वाऱ्यांमुळे थंडी पडते. काश्मीरसह उत्तरेकडील हिमवृष्टीमुळे असे वारे वाहत असतात. यावर्षी अजूनही हिमवृष्टीला सुरुवात झाली नाही, पण कोरडे वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे प्रामुख्याने नागपूर शहरात तापमानात वेगाने घसरण होत आहे. यावर्षी विदर्भातील काही भागात बऱ्यापैकी पाऊस झाला असला तरीही उपराजधानीकडे मात्र पावसाने पाठ फिरवली. त्यामुळे यंदा येथे थंडी कोसो दूर राहण्याची शक्यता अनेकांनी वर्तवली असतानाच उशिरा का होईना, थंडीला बऱ्यापैकी सुरुवात झाली आहे. ऑक्टोबरच्या अखेरच्या आठवडय़ात पाऱ्यात घसरण सुरू झाली आणि नोव्हेंबरच्या पहिल्याच तारखेला रात्रीचे तापमान १४.३ अंशावर गेले. एका दिवसात तब्बल १.३ अंश सेल्सिअसने ही घसरण झाली.

रात्रीच्यावेळी गरम कपडे घालून बाहेर पडणाऱ्यांची संख्याही आता हळूहळू वाढलेली दिसून येत आहे. सिव्हिल लाईन्स, नीरी, अंबाझरी परिसरात सर्वाधिक हिरवळ आहे. त्यामुळे शहरात थंडीला सुरुवात झाली की आधी या परिसरात थंडीचा अनुभव येतो. राज्यभरातच आता तापमानाचा पारा घसरला असून थंडीची चाहूल सुरू झाली आहे. विदर्भात सर्वाधिक कमी तापमानाची नोंद नागपूरनंतर यवतमाळ येथे १४.४ अंश सेल्सिअस इतकी झाली आहे. अकोला, गोंदिया व ब्रम्हपुरी या तीनही शहरात १५ अंश सेल्सिअसच्या आसपास रात्रीचे तापमान नोंदवण्यात आले असून वर्धा १६ तर अमरावती, बुलढाणा १७ अंश सेल्सिअसवर आहेत. विदर्भात सर्वाधिक तापणाऱ्या चंद्रपूर शहरातील तापमान १९ अंश सेल्सिअसच्या आसपास आहे. त्यामुळे यंदा पाऊस नसला तरीही थंडीची सुरुवात उशिरा का होईना बऱ्यापैकी झाली आहे. त्यामुळे जानेवारीपर्यंत तापमानाच्या पाऱ्यात आणखी घसरण होण्याची दाट शक्यता हवामान अभ्यासकांनी वर्तवली आहे.

सौजन्य : लोकसत्ता

तुमची प्रतिक्रिया नोंदवा
अजून दाखवा

संबंधित लेख

Close
%d bloggers like this: