पुणेमहाराष्ट्र राजकीयUncategorized

राज ठाकरेंचं वैयक्तिक नुकसान नाही, पण मनसेचं एक मत गेलं – नाना पाटेकर

राज ठाकरे यांचं वैयक्तिक नुकसान नाही, पण मनसेचं एक मत गेलं असं सांगत नाना पाटेकर यांनी पुढील निवडणुकीत मनसेला मत देणार नसल्याचं सांगितलं आहे.

 पुणे – परप्रांतीय फेरीवाल्यांच्या मुद्द्यावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरेयांनी केलेल्या खोचक टिकेला अभिनेता नाना पाटेकर यांनी उत्तर दिलं आहे. राज ठाकरे यांचं वैयक्तिक नुकसान नाही, पण मनसेचं एक मत गेलं असं सांगत नाना पाटेकर यांनी पुढील निवडणुकीत मनसेला मत देणार नसल्याचं सांगितलं आहे. पुण्यात  एनडीएच्या दीक्षांत समारोहासाठी नाना पाटेकर उपस्थित होते. त्यावेळी कार्यक्रमानंतर बोलताना त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली.

‘राज ठाकरेंनी त्यांचा मुद्दा मांडला होता आणि मी माझा. प्रत्येकाला बोलण्याचा, मुद्दा मांडण्याचा अधिकार आहे. राज ठाकरे यांचं वैयक्तिक नुकसान नाही, पण मनसेचं एक मत गेलं’, असं नाना पाटेकर बोलले आहेत.

काही दिवसांपुर्वी नाना पाटेकर यांनी फेरीवाल्यांविरोधातील कारवाईला विरोध केला होता. गरीब बिचाऱ्या फेरीवाल्यांची काहीही चूक नाही, प्रत्येकाला पोट भरण्याचा अधिकार असल्याचं नाना पाटेकर बोलले होते.

नाना पाटेकर बोलले होते की, ‘मला काल कोणीतरी विचारलं की, फेरीवाल्यांना असं रस्त्यावरुन हुसकावून लावणं, मारणं योग्य आहे का ? माझं एकच म्हणणं आहे, सगळ्यांना जगण्याचा अधिकार आहे. अतिक्रमण नसावं वैगेरे सगळं मान्य आहे. माझी एक साधी वृत्ती अशी आहे की, मी जर माझ्या दोनवेळच्या भाकरीसाठी आज काम करत असेन, आणि ते काम मला नसेल तर मग काय मी काय करेन, तुम्ही खात असाल तर तुमच्या हातचं हिसकावून घेईन. त्यामुळे मला काम करु द्या. यात फेरीवाल्यांची काही चूक नाही. चूक तुमची आमची आहे. इतकी वर्ष का नाही कार्पोरेशननं डिमार्केशन केलेली ? आपण कॉर्पोरेशनला विचारलं का ?’.

नाना पाटेकर यांच्या वक्तव्यावनंतर राज ठाकरे यांनी रंगशारदा सभागृहात बोलताना खडे बोल सुनावले होते. नाना पाटेकर यांनी माहित नाही त्या गोष्टीमध्ये चोमडेपणा करणं बद करावा अशी टीका राज ठाकरे यांनी केली होती. मराठी चित्रपटांना स्क्रिन मिळत नव्हती, तेव्हा नाना पाटेकर बोलल्याचं आठवत नाही असा टोला यावेळी राज ठाकरे यांनी लगावला होता.

काय बोलले होते राज ठाकरे – 
‘महात्मा नाना पाटेकर आज काहीतरी बोललेत ? नाना पाटेकर बोलताना 80 वर्षाच्या आजोबांचा एक टोन असतो’, अशी टीका करताना राज ठाकरेंनी नाना पाटेकरांची नक्कलही करुन दाखवली. ‘वेलकममध्ये भाजा विकत होता ना, त्यामुळे फेरीवाल्यांचा पुळका आहे’, अशी उपहासात्मक टीका राज ठाकरे यांनी केली. ‘नाना पाटेकर यांनी माहित नाही त्या गोष्टीमध्ये चोमडेपणा करणं बद करावं. नाना पाटेकर मराठीतला उत्तम कलावंत आहे, तुमचे चित्रपट बघू…पण नको त्या गोष्टीत पडू नका’, असं राज ठाकरे म्हटले होते.

राज ठाकरे यांनी नाना पाटेकर यांना नाम संस्था सुरु करण्यावरुन प्रश्न विचारले. ‘महाराष्ट्रातील पाण्याचा प्रश्नही सरकारने सोडवायचा आहे, मग कशाला संस्था काढली. संस्था काढण्यापेक्षा सरकारकडे जायला पाहिजे होतं. जिथे सरकारला जमत नाही, तिथे पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेतला ना मग आम्हाला शिकवायचं नाही’, असं राज ठाकरेंनी सांगितलं होतं .

‘मराठी चित्रपटांना स्क्रिन मिळत नव्हती, तेव्हा नाना पाटेकर बोलल्याचं आठवत नाही’,  असा टोला राज ठाकरे यांनी लगावला. आम्ही तुझं अभिनंदन केलं पाहिजे तिथे संजय निरुपम कौतुक करतो असं सांगत राज ठाकरे यांनी खंत व्यक्त केली. यावेळी राज ठाकरेंनी दाक्षिणात्य नेते आणि अभिनेत्यांचं पुन्हा एकदा उदाहरण दिलं. पहा ते कसे एकत्र येतात. तुम्हाला यायचं नाही तर येऊ नका, पण चोमडेपणा कशाला करता. महाराष्ट्रात आमचंच कुंपण शेत खातय असा टोला राज ठाकरेंनी लगावला.

तुमची प्रतिक्रिया नोंदवा
अजून दाखवा

संबंधित लेख

Close
%d bloggers like this: